अहमदनगर दि. 5 - जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त अहमदनगर शहर प्रेसक्लबच्यावतीने ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंतराव विटणकर व जिल्हा माहिती अधिकारी तथा व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचा प्रेसक्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, पत्रकार महेश देशपांडे, माहिती कार्यालयाचे एफ एस पठाण आदी उपस्थित होते.
प्रेस क्लबच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात व्यंगचित्र कलेस आवश्यक असणारे साहित्य देवून व्यंगचित्रकार विटणकर व सरग यांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांनी व्यंगचित्रकला हा पत्रकारीतेचा अविभाज्य भाग असून व्यंगचित्रकारांनी आपला कलेतून पत्रकारीतेला मोठे योगदान दिल्याचे सांगितले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सरग म्हणाले, प्रेस क्लबच्यावतीने अनेक दिशा दर्शी उपक्रम राबविले जातात. व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने प्रेस क्लबने केलेला सत्कार हा आमच्यासाठी आठवणीचा ठेवाच आहे. व्यंगचित्राचा हेतू हा व्यक्तीगत टिका टिपणीचा अथवा चारित्र्य हणनाचा नसतो. तर व्यंगचित्रातून वर्तमानातील सामाजिक घडामोडीवर भाष्य केले जाते. अनेक घटना व वक्तव्याचे दोष दर्शन व्यंगचित्रकार आपल्या रंगरेषातून करत असतो. बदलत्या काळातही व्यंगचित्राकरीतेची भूमिका पत्रकारीतेला पुरकच राहिली आहे. आगामी काळातही व्यंगचित्रकारीतेचे महत्व अबाधित राहील.
यावेळी व्यंगचित्रकार वसंत विटणकर यांनी काही व्यंगचित्र काढून आपल्या कलेचे प्रात्यक्षिक दाखविले. तर आभार प्रदर्शन पत्रकार महेश देशपांडे यांनी केले.

Post a Comment