प्रेस क्लबचा हसरी दिवाळी कार्यक्रम उत्साहात हास्यकलाकार मकरंद टिल्लूंनी हसवून-हसवून उडवली धमाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर प्रेस क्लबच्या वतीने दीपावली निमित्त पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित हसरी दिवाळी कार्यक्रमात प्रसिध्द हास्यकलाकार मकरंद टिल्लू यांनी उपस्थितांना दिलखुलास हसवले. बाळपणीच्या गमती जमती, वाढत्या वया बरोबर कमी झालेले हसणे, टिव्ही सिरियल, जाहिराती यावर विनोद कथन करुन मकरंद टिल्लूंनी हसवून-हसवून धमाल उडवली.


कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कवडे यांनी प्रेस क्लबच्या विविधांगी उपक्रमाचे कौतुक करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी प्रेस क्लबच्या वतीने सण, उत्सव, ईद व राबविण्यात येणार्‍या सामाजिक, शैक्षणिक विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले.
मकरंद टिल्लू यांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी हसण्याचे महत्त्व सांगून, ना नफा ना तोटा या तत्त्वावर हसण्याचे विविध प्रकार दाखवले. वय वाढल की हसण कमी होत नसून, हसण कमी झाल की वय वाढत. विनोद हसण्यासाठी असतो पण हसणे विनोदासाठी नसल्याने विनोदाविना देखील हसता येत असल्याचे स्पष्ट केले. मनुष्य व जनावरांमधील हसण्याचा फरक उलगडून दाखविताच सभागृहात हशा पिकली होती. तसेच जीवनातील ताण तणावावर मात करण्यासाठी आनंदी जीवनासाठी हास्य योगचे महत्त्व विशद केले. वाया जाणारे पाण्याची बचत करण्यासाठी पाणी गळती मुक्त शहर करण्याचा संकल्प करत, गलक्या नळांना बदलण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विठ्ठल लांडगे यांनी केले. उपस्थितांचे आभार महेश देशपांडे महाराज यांनी मानले. शेवटी फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post