सार्वजनिक क्षेत्रातील अंदाजपत्रक आणि अंमलबजावणी या विषयाशी संबंधी अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी कवडे यांची निवड झाली होती. तीन आठवड्यांचा प्रशिक्षण दौरा पूर्ण करुन जिल्हाधिकारी अनिल कवडे परतल्यानंतर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित स्वागत समारोह संपन्न् झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, गोपीचंद कदम, चंद्रभान पराते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, अंदाजपत्रक हा घटक कोणत्याही विकासकामाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. करवसुलीद्वारे अर्जित झालेल्या निधीचा योग्य कारणासाठी सुयोग्य पध्दतीने उपयोग याबाबी विकासदरामध्ये महत्त्वाच्या ठरतात. तसेच प्रशासनातील मनुष्यबळाचे समर्पित काम, नागरिकांचे संस्कार, नीतीमुल्य, सद्गुण याबाबींना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्तर अमेरिकेत असलेल्या नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देत जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, त्या ठिकाणी असलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन तेथील नागरिकांनी विकासदर कायम राखला आहे. तसेच कॅलिफोर्नियात गेल्या तीन वर्षापासून पाऊस पडलेला नाही, तरीही पाण्याचा दुष्काळ तिथे जाणवत नाही, याचे कारण तेथील नियोजनात आहे. ते नियोजन नागरिकांनी मनापासून अंगिकारल्याचेही चित्र आहे. केवळ तरुणांची मोठी संख्या असून उपयोगाची नाही तर गुणवत्तापूर्ण, सुसंस्कारीत तरुणांची आवश्यकता आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सेवा, सार्वजनिक जीवनातील शिस्त या बाबींचा अंगिकार केल्यास भारत देशाच्या महासत्तेची वाटचाल अधिक सोपी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत प्राणी, पक्षी, वनस्पतींना माणसांइतकेच महत्त्व असल्याचे जिल्हाधिकारी कवडे यांनी अधोरेखीत केले. तेथील नागरिकांमध्ये असलेल्या वाचनसंस्कृतीकडे लक्ष वेधतांनाच तेथील उणिवांचाही ऊहापोह केला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करीत महेश देशपांडे महाराज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेस क्लबच्या वतीने विठ्ठल लांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कवडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शेवटी आभार विजयसिन्ह होलम यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment