देशाच्या जडण घडणसाठी श्रमसंस्कृती रुजवणे आवश्यक -जिल्हाधिकारी कवडे

प्रेस क्लब, चाईल्ड लाईन व रोटरी क्लबच्या वतीने बालदिन उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रमाणिकपणा जीवनाचा पाया असून, समाजाप्रती कृतज्ञतेची भावना मनात ठेवून जीवन जगले पाहिजे. भारत माझा देश आहे! ही प्रतिज्ञा असतित्वात आनण्याची गरज आहे. देशाच्या जडण घडणसाठी श्रमसंस्कृती रुजवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.

प्रेस क्लब, स्नेहालय संचलित चाईल्ड लाईन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास्थळी बालदिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख, रोटरीचे अध्यक्ष मनिष बोरा, स्नेहालयाचे गिरीष कुलकर्णी, राहुल मनियार, चाईल्ड लाईनचे हनिफ शेख, अमोल पंजाबी, महेश देशपांडे महाराज, दीपक हरके, चंदा पारिक, शहर वाहतुक शाखेचे पो.नि. अजित लकडे आदिंसह चाईल्ड लाईन व बालभवनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की, मुलांना शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्काराची मुल्ये रुजवणे अपेक्षित आहे. आयुष्यात मदत करणार्‍यांप्रती नेहमी कृतज्ञतेची भावना जोपासण्याचे व बालकांचे जीवन सुखी व समाधानी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबर स्वच्छतेचा संदेश दिला.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन बालदिनाच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. मुलांनी हवेत फुगे सोडून देश की ताकत, हम सब बच्चे! ची जोरदार घोषणा दिली. लहान मुलांच्या डोक्यावर फेटे बांधून गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात गिरीष कुलकर्णी यांनी बालहक्क सप्ताह अंतर्गत राबविण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, स्वाक्षरी अभियान, बालहक्कांवर आधारित पथनाट्य व प्रचार फेरीची माहिती दिली. तसेच संस्थेच्या माध्यमातून पुढील वर्षी बाल अत्याचारमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महेश देशपांडे यांनी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याबरोबर प्रेस क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत असल्याचे सांगितले. यु.एस.ए. बॉस्टन येथून आलेले परदेशी पाहुणे निक, ज्योत्सना, हर्षना, मॅक व सुभाष यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.मुन्ना खान यांनी केले. उपस्थितांचे आभार हनिफ शेख यांनी मानले. शेवटी बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश देण्यासाठी शहरातील मुख्य मार्गावरुन रॅली काढण्यात आली. उपस्थित मुलांना खाऊ व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक शबाना शेख, कृष्णा पाडवी, शिल्पा केदारे, शाहिद शेख, रवी भिंगारदिवे, सुनिल मोहिते, मीना लाटकर, प्राची सोनवणे आदिंसह चाईल्ड लाईन व बालभवनच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post